धार्मिक, सांस्कृतिक

–धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक उत्सव–

ग्रामदैवत हनुमान जयंती यात्राउत्सव

चैत्र महिना सुरु होण्यापुर्वी जवळजवळ शेतीची कामे संपत आलेली असतात. त्यामुळे शेतकरी कामातून थोडे निवांत झालेले असतात. त्यावेळी सर्वांना यात्रेचे वेध लागतात. यात्रेचे कार्यक्रम आणि वर्गणीबद्दल गावकयांची बैठक म्हणजे यात्रेची नांदी असते यात्रा जवळ आली की लहानांपासून मोठयापर्यंतच्या उत्साहाला उधान येते बाहेरगावी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने गेलेले लोक नातेवाईक या निमित्ताने एकत्र येतात यात्रेच्या आधी ज्ञानेश्वरी पारायण घेतले जाते. या पारायणाच्या काळात रात्री किर्तन व प्रवचनाचे कार्यक्रम घेतले जातात. तसेच भजन, भेदीक, भारुड इ. कार्यक्रम ही पारायण काळामध्ये घेतले जातात.

हनुमान जयंती

या यात्रेमध्ये मांडव, बैलगाडयांच्या शर्यती सायकल शर्यती, मांडव, बैलगाडयांच्या शर्यती, सायकल शर्यती, धावण्याची शर्यत, पोहण्याची स्पर्धा, तमाशा, कलापथक व गावातीलच जय हनुमान नाटय मंडळ यांचा नाटकाचा कार्यक्रम होतो यात्रेच्या काळात या कार्यक्रमाची रेलचेल असते. हनुमान जयंती निमित्त एकतारी भजन व संगीत भजन स्पर्धा घेतल्या जातात.

चैत्रशुद्ध पोर्णिमेला गावची यात्रा ही यात्रा म्हणजे जणू गावची दिवाळीच असते प्रत्यक्षात यात्रेचा दिवस उजाडतो त्यादिवशी सकाळी सर्वजण लवकर अंघोळ करुन हनुमान मंदीरामध्ये सर्व ग्रामस्थ महिला एकत्र येतात व सकाळी सहाच्या दरम्यन हनुमान जन्मउत्सव साजरा करुन फुले टाकली जातात. सर्वांना सुंटवडा वाटला जातो तसेच दुपारी 12 वाजता किर्तनाचा कार्यक्रम घेतला जातो. रात्री गावातून देवाच्या पालखीची मिरवणूक मानकरी खोत यांच्यापासून होते खोत (पाटील) असणारे मानकरी देवाळामध्ये आल्यानंतर त्यांच्या हास्ते देवाच्या पालखीची मिरवणूक गावातून काढली जाते. या पालखीपुढे गावातील सर्व प्रासादिक भजनीमंडळे भजन सादर करतात. बॅंड पथकाच्या गजरात पालखीची मिरवणूक गावातून निघते पालखीसमोर गुलाल खोबरे उधळले जाते.

पालखीपुढे शोभेच्या दारुची अतिषबाजी केली जाते. पालखीची मिरवणूक गावातून पुर्णपणे काढली जाते व पालखी देवळात आल्यानंतर सर्वांना खिरीचा प्रसाद दिला जातो. यात्रेच्या दिवशीच रात्री 10 वाजता कोल्हापुरच्या झंकार ओर्केस्ट्राचा कलापथकाचा कार्यक्रम होतो. या कलापथकामध्ये हिंदी मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम होतो व या कार्यक्रमानंतर लघुनाटीका सादर केली जाते.

दुसया दिवशी सकाळी बैलगाडी शर्यती घेतल्या जातात. तसेच धावण्याच्या शर्यतीही घेतल्या जातात. तसेच सायकल शर्यती ही घेतल्या जातात. यामध्ये नंबर आलेल्यांना योग्य ती बक्षीसे दिली जातात. यामध्ये बैलगाडी शर्यतीसाठी पाच हजार रुपयांपर्यतची बक्षिसे व निशाण इनाम म्हणून ठेवली जातात सायंकाळी नंबर आलेल्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण केले जाते.

यात्रेच्या निमित्ताने विविध वस्तुंची विक्री करणारे दुकानदार आलेले असतात. त्यामध्ये पाळणेवाले बांगडया विकणारे, फुगेवाले शेव चिरमुरे विक्रेते भेळवाले लहान मुलांच्या खेळण्याच्या वस्तुची विक्री करणारे दुकानदार मोठया प्रमाणात आलेले असतात. रात्रीचे जेवण झाल्यानंतर गावातील सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषाची पावले तमाशाच्या फडाकडे वळतात तमाशाच्या रंगमंचावरील मुख्य पडदा बाजूला होतो. आणि सुरु होतो ढोलकीचा खणखणाट तोच प्रेक्षकामधून शिट्टयांच मारा सुरु होतो. आणि वर्षभर ज्या तमाशाची आतुरतेने वाट पाहिली जाते. त्या तमाशाला सुरुवात होते गण–गवळण मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रम वननाटय यातून प्रेक्षकांची करमणूक आणि जनजागृती केली जाते.

लहांनापासून तो वृध्दापर्यंत ज्याची वर्षभर वाट पाहत असतो तो कार्यक्रम म्हणजे गावातीलच जय हनुमान नाटय मंडळातील कलाकारांचे नाटक तिसया दिवशी रात्री 9 वाजता होते आणि यात्रा सपंते त्यानंतर यात्रेच्या आठवणी जागवत पुढील यात्रेच्या प्रतिक्षेत सर्वजण असतात.

एक गाव एक गणपती स्पर्धेत गावाने हिरहिरीने भाग घेतला. गावात सुरुवातीला दहा ठिकाणी गणपती बसविला जात असे त्यातून चुरस निर्माण होऊन मंडळातील युवकामध्ये भांडणे होत असत. त्यामुळे एक गाव एक गणपती स्पर्धेत भाग घेऊन गावात एकच गणपती बसवण्यात आला त्यामुळे गावात एकोप्याचे वातावरण निर्माण झाले गणेशोत्सवात चांगले सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने कथाकथन नाटके इ. विविध उपक्रम राबविण्यात येतात.

गणेशोत्सव हा सर्वांना आनंदाची पर्वणी देणारा उत्सव गावात बरीच मंडळे गणेशोत्सवात आघाडीवर असतात. ऐतिहासिक, सामाजिक प्रबोधन करणारे देखावे आणि चांगले कार्यक्रम आयोजित केले जातात.

गावातील श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो. त्यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो त्यात प्रवचन कीर्तन यांचा समावेश असतो गोपाळ काल्याला गावात शिवशंभो मंडळाची दहिहंडी बांधलेली असते. गोविंदारे गोपाळाच्या गजरात तरुण मनोरे रचून दहिहंडी फोडतात. त्यानंतर संपूर्ण गावाला अन्न प्रसादाचे वाटप केले जाते.

बैलपोळा आनंदाने साजरा केला जातो वर्षभर ज्याच्या जीवावर बळीराजा शेती करत असतो. त्या बैलांना स्वच्छ धुवून त्याची शिंगे रंगवून त्या बैलांना सजवून बैल पोळयाच्या दिवशी वाजतगाजत गावातून मिरवणूक काढली जाते. व त्याला पुरणपोळीचा नेवैदय दाखविला जातो.

रामनवमी निमित्त गावातील बाळासो राजाराम सालुंखे यांच्या घरी रामजन्मोत्सव साजरा करुन सर्वांना अन्न प्रसादाचे वाटप केले जाते.

शिवजयंती, तुकाराम बीज ही गावातील नामदेव जामदारे याची घरी साजरी करण्यासाठी गावातील सर्व लोक एकत्र जमतात. त्यांना अन्न प्रसादाचे वाटप केले जाते.

डॉ. आंबेडकर जयंती, ईद, महाशिवरात्र हे सर्वच जाती धर्माचे सण–उत्सव मोठय उत्साहात साजरे केले जातात. या सर्व कार्यक्रमात गावकरी उत्साहाने सहभागी होतात.

गावात लक्ष्मीची यात्रा महादेवाचा भंडारा, मरीआईची यात्रा इ. छोटया यात्रा भरतात.


 राष्ट्रीय सण-

15 ऑगस्ट, 26 जानेवारी हे राष्ट्रीय सणही मोठया उत्साहाने साजरे केले जातात या राष्ट्रीय सणांना शाळेतील व हायस्कूलमधील विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम विविध कसरतीचे प्रयोग व कवायत करत असतात.